Sunday, November 04, 2007

fall-2007 dept.



असा गाफिल होऊन चालू नकोस
हे बघ, फक्त रंग बदलतायेत
माहितीये झाडांचे कसे पारे उडालेत
वाटतं पार कायापालट झालाय

असलं हे नेहमीचंच बरं-का
चांगलं हिरवं भरलं रान असतांना
रुसून सन्‍यासाची करायची सोंगं
मिरवायचे जरा भगवे-तांबडे कपडे

मग बर्फांचे फवारे लागले
थंडीनी चांगली जरब आणली
की येईल जरा डोकं ठिकाणावर
हळूच चढेल पुन्हा खराखुरा रंग

अरे सोंगं कधी टिकत नाहीत
मी कधीच फसलो नाही, सांगतो
तू ही जास्तं भाव देऊ नकोस
त्याचं हे असं नेहमीचंच आहे...