विंदा करंदीकरांना ज्ञानपीठ पुरस्कार काल जाहीर झाला. हे एक बरेच झाले. सरकार-दरबारी मराठी माणूस आपला शिरकाव करू शकत नाही हा सिद्धांत अखेर खोटा ठरला. ज्ञानपीठ पुरस्कार हा देखिल आमच्या कंपनीच्या Employee of the Quarter Award सारखा rotationने दिला जातो हे ऐकून बरे वाटले.
शाळेत असतांना एकदा विंदांच्या कवितेवर once-more व पहिले बक्षीस मिळवले होते. त्या वेळेस अजाणतेपणामुळे त्यांचा उल्लेख 'कवयित्री विंदा' असा केल्याबद्दल, उशिरा का होईना, मी इथे दिलगिरी व्यक्त करू ईच्छीतो. विंदा ऋषीतुल्य वगैरे आहेत असे आज पेपरमधे आल्यामुळे ही एक गफलत ते माफ करतीलच अशी माझी मनापासून खात्री आहे.
माफ केले नाहीच, तर आम्ही त्यांचेच शब्द त्यांच्यावरच उलटवू:
घेता
देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे.
हिरव्यापिवळ्या माळावरून
हिरवीपिवळी शाल घ्यावी,
सह्याद्रीच्या कड्याकडून
छातीसाठी ढाल घ्यावी.
वेड्यापिशा ढगाकडून
वेडेपिसे आकार घ्यावे;
रक्तामधल्या प्रश्नांसाठी
प्रुथ्वीकडून होकार घ्यावे.
उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी;
भरलेल्याश्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणार्याने देत जावे;
घेणार्याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस
देणार्याचे हात घ्यावे !