Sunday, January 08, 2006

भाव(खाऊ)सरगम dept.

काल थोडासा ताप होता. तरी tickets काढले होते म्हणून ह्रदयनाथ मंगेशकरांच्या कार्यक्रमाला गेलो. या आधी दोनदा बघून झाला होता, पण पुण्यात नव्हे. एकदा बँकॅाक मधे, आणि एकदा नासिकला. बँकॅाकला वडीलांनी 'ती गेली तेंव्हा' ची फर्माईश केली होती. पंडीतजींनी ती स्वीकारली, पण "या कवितेचा अर्थ बाकीच्या लोकांना कळेल का?", असा टोमणा वर मारलाच.

वास्तवीक अशा खऊटपणाला काहीच कारण नव्हते. कदाचित आपण पुण्यात आहोत असे पळभर त्यांना वाटले असेल.

ही कविता माणिक गोडघाटे ऊर्फ कवी 'ग्रेस' यांची आहे. त्यांच्या कवितेवर अनेक लोक दुर्बोधतेचा आरोप करतात. वास्तवीक हा आरोप चुकीचा आहे. खरं म्हणजे, कष्ट केले तर त्यांच्या काही कवितांना अर्थ असावा असे भासते. ईतकेच काय, त्यात काही-काहींचा तर संदर्भांसकट अर्थ देखिल लागतो. त्यातलीच ही 'ती गेली तेंव्हा'. बाकीच्या कविता अगदीच NP-complete आहेत. प्रस्तुत कवितेचा अर्थ सांगणार्यास Millenium Prize देखिल सहज मिळू शकेल.


उखाणा

शुभ्र अस्थींच्या धुक्यांत
खोल दिठींतली वेणा
निळ्या आकाश-रेषेंत
जळे भगवी वासना.

पुढे मिटला काळोख --
झाली देऊळ पापणी;
आतां हळूच टाकीन
मऊ सशाचा उखाणा.


तरी, मैफल चांगलीच रंगली. ताप विसरलो. सकाळी २ वा. घरी परततांना हुडहुडी भरून ताप परत आला. आजचा दिवस झोपून आहे.

1 comment:

aghal-paghal said...

थोडिशी उशीरानेच प्रतिक्रिया देतोय पण ग्रेसचा उल्लेख आला आणि रहावलच नाही. मला वाटत ग्रेस ही समजण्याच्या आधी अनुभवण्याची गोष्ट आहे. बर्‍याचश्या कविता प्रथमदर्शनी अनाकलनीय वाटतात पण कालांतराने परत परत वाचल्या नंतर आणि काही अनुभवांशी त्यांची सांगड घातल्यावर अर्थ कळू लागेल. मला स्वत:ला ग्रेस च्या बर्‍याच कविता कळालेल्या नाहित. पण त्या वाचल्यावर जे एक गुढ समाधान किंवा आनंद मिळतो त्याची तुलना नाही.

बाकी पंडितजींबद्दल काय बोलणार. मी सुद्धा मागच्या महिन्यात "भावसरगम" चा अनुभव घेतला. पण त्या बद्द्ल परत कधी तरी लिहिन. :)